वृद्धेचे दागिने लंपास; सिडकोत भरदिवसा घडली घटना

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : 'तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे' अशी थाप मारत दुचाकीस्वार भामट्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धेला लुबाडले. दीड तोळ्याचे मिनी गंठण आणि साडेतीन ग्रॅमची अंगठी, असा १८.५ ग्रॅम सोन्याचा ऐवज हातोहात लंपास केला. २६ एप्रिलला सकाळी ८.१५ वाजता बळीराम पाटील शाळा ते सावरकर चौकादरम्यान एका हॉस्पिटलसमोर घटना घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा व्यंकटराव भोसले (६०, रा. रायगडनगर, एन-९, सिडको) या फिर्यादी आहेत. रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत होत्या. त्यावेळी भामट्याने, तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे, ती घेण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल. अशी
बतावणी त्याने केली. सुरुवातीला प्रतिभा यांनी मुलगा घरीच आहे, तुम्ही त्याला घेऊन जा, असे सांगितले. मात्र, भामट्याने जवळच लॉटरीचे कार्यालय आहे, तुम्हीच चला असे म्हणत त्यांना बळजबरी दुचाकीवर बसवले आणि तो त्यांना एन ८ भागात नगरसेवक विश्वनाथ स्वामी यांच्या घराच्या परिसरात घेऊन गेला.
काहीतरी कारण काढून त्यांना अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले. प्रतिभा यांनी दीड तोळ्याचे मिनी गंठण आणि साडेतीन ग्रॅमची अंगठी त्याच्या हातात दिली. माझ्या बहिणीचे घर जवळच आहे, मी तिथून येतो, तुम्ही इथेच थांबा, असे सांगून तो दुचाकीवरून पसार झाला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय नरोडे अधिक तपास करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions